Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेचा १६८० कोटींचा अर्थसंकल्प ! पण सगळं सरकार भरोसे, नगरकर गॅसवरच..

Updated on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत बुधवारी १२ मार्चला सादर केला. यावेळचा १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय. पण हे सगळं खरं असलं तरी मनपाकडे यातले ३० टक्केही पैसे नाहीत. त्यामुळे नगरकर सध्या सरकारभरोसे आहेत. कस ते पाहूयात..

या १६८० कोटींमध्ये कामगारांचे वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शन ५४ कोटी, पाणी पुरवठा वीज बिल ४० कोटी, स्ट्रीट लाईट वीजबिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ६ कोटी, महिला व बाल कल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी उद्यान दुरुस्ती २५ लाख आदींसह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.

आता एक नजर या अर्थसंकल्पातील मुख्य घोषणावर टाकुयात की ज्या अत्यंत लक्षवेधी आहेत. शहरात काम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र भव्य वसतिगृहाची उभारणी, पर्यटन व धार्मिक स्थळांचा विकास आणि सुशोभीकरणासाठी तरतूद, सर्जेपुरा रंगभवन पाडून पार्किंगसह नवीन संकुल उभे करणार, ई-बस सेवेसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद, संविधान भवन उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद, सावेडी उपनगरात जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू, सावेडी नाट्यगृहाचे रखडलेले काम मार्गी लागणार, आदी लक्षवेधी घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आल्यात.

पण आता हे खरं असलं तरी १६८० पैकी १३०० कोटी रुपयांचा खर्च सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून असणार आहे. मनपाच्या स्वनिधीतून ४२१.६८ कोटी रुपयांचा खर्च होणार असला, तरी त्यातही जीएसटी अनुदानातून १४०.६७कोटी खर्च होणार आहे. जीएसटी अनुदान व मनपाच्या उत्पन्नातून पगार, पेन्शनवर २३०.६४ कोटी, वीजबिलावर ४८ कोटी खर्च होणार आहे. उर्वरित खर्चही अत्यावश्यक सेवा, योजनांच्या स्व-हिश्यावर होणार आहे. त्यामुळे सरकारने निधी दिला, तरच वर उल्लेख केलेले सगळे प्रकल्प व योजना होणार आहेत, अन्यथा मनपाला काहीही काम करता येणार नाही हे वास्तव आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe