अहमदनगर बातम्या

Ahilyanagar News : मृत्यूनंतरही भोग संपेनात ! नगरमधील अमरधाममध्ये मृतदेहांसोबत होतेय ‘असे’ काही..

Published by
Ahmednagarlive24 Office

मृत्यू झाला म्हणजे सगळे संपले असे म्हणतात. परंतु नगरच्या अमरधाम मध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. येथे मृत्यूनंतर देखील ससेहोलपट होत आहे. मृतदेहांची मन ओशाळून टाकणारी विटंबना होत आहे. स्टेशन रोड परिसरामध्ये अमरधाममध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पहावयास मिळाली.

काही दिवसांपूर्वी मृतावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचे नातेवाईक विधी झाल्यानंतर निघून गेले. त्यानंतर श्वानांनी मृताचे अवयव इतरत्र नेले. ही विटंबना स्थानिक नागरिकांनी पाहिली व शिव राष्ट्र सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना सांगितली. यानंतर शिवराष्ट्र सेना शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन मनपाने यावर उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले की, स्टेशन रोडवरील अमरधाममध्ये अंत्यविधीला आलेल्या लोकांना सर्वत्र कचरा असल्यामुळे बसायला जागा मिळत नाही. त्या ठिकाणी हात व पाय धुण्याकरिता पाण्याची सोय नाही. तसेच रात्री व संध्याकाळी अंत्यविधी करण्याकरता लाईट नाही. महत्वाचे म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा वॉचमन नाही.

वॉचमेन नसल्याने जिवंत माणूस आणून जाळला तरी त्याची कुणाला खबरदारी घेता येणार नाही आणि नोंदणी नसल्याकारणाने मृत्यू दाखलाही मिळणार नाही. आजूबाजूला भुयारी गटाराच्या नाल्या अमरधाम परिसरात सोडलेले असल्याकारणाने त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी साठलेले आहे. शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने पुढील काळात संपूर्ण व्यवस्था न झाल्यास महानगरपालिकेच्या प्रांगणातच प्रतिकात्मक अंत्यविधी केला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिला.

यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. घडलेला प्रकार अंत्यविधीला आलेल्या लोकांनी पाहिल्याने संताप व्यक्त होत आहे. अशी दयनीय अवस्था पाहिल्याने मृत्यूनंतरही भोग सम्पेनात अशी भावना लोकांत निर्माण झाली होती.

Ahmednagarlive24 Office