Ahilyanagar News : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल शनिचरणी ! म्हणाले, शनिशिंगणापुरात येऊन…

Published on -

सोमवार दि. 28 रोजी सकाळी अकरा वाजता शनिशिंगणापूर येथे मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल विश्वनाथन यांनी पत्नी सुचित्रा यांच्यासह सहकुटुंब शनि दर्शन घेतले.

केरळच्या मल्याळम चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत असलेले अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहनलाल विश्वनाथ यांनी दोनशेच्यावर मल्याळम चित्रपटात काम केले आहे. मोहनलाल हे दाक्षिणात्य मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानलेले जातात. सुमारे 40 वर्षा पेक्षा जास्त काळ ते मल्याळम चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत.

त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मभूषण व पद्मश्री या भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मोहनलाल विश्वनाथन यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता पत्नी सुचित्रा व परिवारातील इतर सदस्यांसह शनिशिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेतले. त्यांनी देवस्थाच्या यज्ञ मंडपात सहकुटुंब शनी देवाचा अभिषेक केला. त्यानंतर सहकुटुंब शनी चौथऱ्यावर जाऊन शनि देवाला तेल अर्पण केले. यावेळी बोलताना मोहनलाल म्हणाले जगविख्यात शनिशिंगणापूर येथील शनि दर्शनाने मनाला मोठे समाधान मिळाले आहे.

यानंतर त्यांनी देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार स्वीकारला. यावेळी या शनेश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर,माजी अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, विश्वस्त आप्पासाहेब शेटे,पोपटराव कुऱ्हाट देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. के. दरंदले आदी यावेळी उपस्थित होते. मोहनलाल यांच्या चाहत्यांनी त्यांना बघण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News