त्रंबकेश्वर कुंभेळ्यानिमित्ताने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान न्यासाकडे भाविकांसाठी असलेल्या मुलभूत सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधा शासनामार्फत निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकार मार्फत कामासाठी 18 कोटी 57 लाख रुपये खर्चाचा विकास आराखडा प्रस्ताव शनिशिंगणापूर देवस्थान समितीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.के दरंदले यांनी याबाबत माहिती दिली.
पुढील वर्षी 2026 पासून नाशिक त्रंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यामुळे शिर्डी, शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांसाठी पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने शिर्डी, शनी शिंगणापूर येथील विकासासाठी कॉरिडॉर मंजूर केला आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थान कडे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा सादर करण्यास सांगितले होते. यामुळे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के दरंदले यांनी सुमारे 18 कोटी 57 लाख रुपयाचा प्रस्तावित कामांचा सुची आराखडा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर केला आहे.

या आराखड्यातील प्रस्तावित कामांचा तपशिल पुढील प्रमाणे – देवस्थान न्यासाचे मालकिचे गट नं. २६० मध्ये वाहनतळाचे काँक्रीटीकरण, बहुउद्देशिय पत्रा शेड, सुशोभिकरण इ. कामे, दोन लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या टाकीचे बांधकाम करणे, स्त्री/पुरूंषासाठी स्वच्छता गृहाचे बांधकाम करणे घोडेगाव येथील गट नं.४०१ मध्ये वाहनतळासाठी काँक्रीटीकरण, टॉयलेट ब्लॉक, संरक्षक भिंत, हेलिपॅड स्वागत कक्ष व १ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाणी टाकीचे बांधकाम करणे,
कांगोणी ते शनिशिंगणापूर रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करणे, घोडेगाव ते सोनई लगत पानसनाला ते शनिशिंगणापूर ते हिंगोणी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करणे, देवस्थान न्यासाचे मालकीचे मौजे शनिशिंगणापूर येथील गट.नं.२६० मधील भक्तनिवास क्र.०५ च्या ४ थ्या मजल्याचे बांधकाम करणे, असा अंदाजित १८ कोटी ५७लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.