लाच मागितल्याप्रकरणी सावेडीच्या मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते व तलाठी सागर एकनाथ भापकर या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात २६ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
अॅन्टी करप्शनच्या अहमदनगर पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईमुळे शासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार व त्यांच्या नातेवाईकांचा सावेडी येथे १८ हजार चौरस फुटाचा प्लॉट आहे.
सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरिता २२ स्वतंत्र उपविभागणी केलेली आहे. २२ प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाईन, अपलोड केल्याच्या मोबदल्यात ४४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी मंडलाधिकारी देवकाते यांनी दर्शवली.
लोकसेवक भापकर यांच्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २२ प्लॉटचे ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडलाधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे मार्गदर्शनाखाली पोनि. शरद गोर्डे, पोनि. छाया देवरे, पोकॉ. सचिन सुद्रिक, पोकॉ. बाबासाहेब कऱ्हाड, पोहेकॉ. हारुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, शासकिय कामासाठी एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे