अहमदनगर बातम्या

वीस विद्यार्थ्यांना विषबाधा, अहमदनगरमधील ‘या’ शैक्षणिक संस्थेतील मुलांसोबत प्रकार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे.

गुरुवारी पहाटे हा प्रकार समोर झाला. बाबासाहेब महाराज मतकर ही वारकरी शिक्षण संस्था चालवितात. या संस्थेत ३६ विद्यार्थी निवासी आहेत. आळंदी क्षेत्राच्या धर्तीवर नैमित्तिक शिक्षणाचे जोडीने वारकरी शिक्षण दिले जाते.

पहाटे तीन चार मुलांना उलट्या, जुलाब, मळमळ असा त्रास सुरु झाला. मतकर यांनी खासगी वाहनाने कमी अधिक त्रास सुरु असलेल्या वीस जणांना तिसगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथे डॉ. बारगजे यांनी मुलांवर उपचार केले. नऊ-दहा मुलांची प्रकृती काही तासांतच स्थिर झाली. इतर मुलांचीही प्रकृती दुपारपर्यंत स्थिरावली. सायंकाळी मुलांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

दरम्यान या घटनेनंतर चिंतेचे वातावरण तयार झाले होते. परंतु मुलांचीही प्रकृती दुपारपर्यंत स्थिरावली. मुलांची प्रकृती आता स्थिरावली असल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडलाय.

कशामुळे झाली असेल विषबाधा?
संस्थेत विद्यार्थ्यांना जेवण बनवून दिले जाते. त्यातून विषबाधा होऊन या विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्याचा त्रास झाल्याचे प्रथमदर्शी कळाले. सर्व विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे म्हणाले.

दरम्यान, डॉ. बारगजे म्हणाले, उघडे, शिळे अन्न सेवनाने, दूषित हवामानाने असे त्रास होतात. वय कमी असल्याने सहनशीलता नसते. त्यामुळे जास्तीचा त्रास होतो. वेळेत उपचार मिळाल्याने धोका टळला असल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office