अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात शिवरस्त्याच्या वादातून निर्घृण खून

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा एकीकडे सुसंस्कृत, ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. परंतु अलीकडील काळात काही गुन्हेगारी घटनांमुळे अहमदनगरमधील वातावरण ढवळून निघत आहे. मारहाण, खून आदी घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे.

आता शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.४) सकाळी नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंगदरा मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचेमृत व्यक्तीचे नाव आहे.

वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमले वस्ती आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी तलावाजवळून रस्ता आहे. गुरुवारी (दि.४) सकाळी तिरमले वस्ती वरील एकाबरोबर मोहन दांगडे यांचा वाद झाला.

या वादाचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले. यामध्ये दांगडे यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलिस पथकासह जिल्हा रुग्णालयात धाव घेत मृताच्या नातेवाईकांकडून व तेथे उपस्थित वाळकीच्या काही नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या खबरेवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील वाढत चाललेली गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झाला आहे. पोलिसांनी वेळीच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात व गुन्हेगारी वृत्ती ठेचावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office