अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेईना. आज सर्वत्र थर्टीफस्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु असतानाच पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला असून यात ३ जण जागीच ठार झाले आहेत.
यात ८ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अहमदनगर दौंड महामार्गावर हा अपघात झाला. शाबाज शेख, गाजी बांगी आणि लुजैन शेख असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर इतर आठ लोक गंभीर जखमी आहेत. हा अपघात अहमदनगर दौंड महामार्गावर रविवारी (३१ डिसेंबर) सकाळी ११ वाजता घडला.
कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याण वरून नगरकडे चालले होते अशी माहिती मिळाली आहे. दर्शनासाठी जातानाच दौंडजवळ त्यांची कार व भरधाव ट्रकची धडक झाली. या अपघातामध्ये काळाने शेख कुटुंबियांवर घाला घातला असून परिसरात नववर्षलाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी तात्काळ जखमीपैकी काहींना दौंड तर काहीना श्रीगोंदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेण्यात आले.
देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यात असणाऱ्या मृतांची संख्या चिंताजनक आहे. वाहने चालवताना सर्वांनी व्यवस्थित काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.