Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात तरुणावर पाच जणांनी कुऱ्हाड, चॉपर व दगडाने हल्ला चढवला. तसेच गोळीबारही केला असल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री शहरातील कोठला परिसरात ही घटना घडली असून हा प्रकार ट्रॅव्हल्स व्यवसायातील वादातून झाला असल्याचे बोलले जात आहे.
सरवर अस्लम शेख (वय ३३, रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याने दिलेल्या जबाबावरून दानिश फारुख शेख ऊर्फ धन्या, साहिल (पूर्ण नाव माहीत नाही), उफेर ऊर्फ लाल्या (पूर्ण नाव माहीत नाही), गणेश पोटे व तालीब (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी सरवर व आरोपी दानिश शेख या दोघांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. २५ एप्रिल रोजी सरवर याचा दानिश व साहिल यांच्यासोबत ट्रॅव्हल्सच्या प्रवासी सीट भाड्यावरून माळीवाडा बसस्थानक येथे किरकोळ वाद झाला होता.
२७ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सरवर हा त्याच्या मित्राबरोबर कोठला येथे बाकडावर बसला होता. याचवेळी तेथे आलेल्या दानिश व साहिल यांनी सरवर याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हे वार सरवर याच्या हातावर लागले.
यावेळी सरवर हा पळून जात असताना उफेर व गणेश पोटे याने त्याच्यावर चॉपरने वार केले तर तालीब याने दगड फेकून मारला. दरम्यान, दानिश याने बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सरवर याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
या फिर्यादीवरून आरोपींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेत नगरसेवक सहभागी ? की आणखी कोणी?
भर शहरात घडलेल्या या प्रकाराने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, सरवर शेख याने दिलेल्या फिर्यादीत ‘मेंबरने जसे सांगितले तसे कर असे आरोपी एकमेकांशी बोलतानाचा उल्लेख आहे. शहरात नगरसेवकाला ‘मेंबर’ असे म्हटले जाते. त्यामुळे या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.