अहमदनगर ब्रेकिंग : आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करा…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा बहाणा करून आ. संग्राम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी (दि. ६) संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घातलेला धिंगाणा, गोंधळ निषेधार्थ आहे.

हिडीस पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. त्यामुळे आ. जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नगरमध्ये रविवारी लोकार्पणानंतर निर्माण झालेल्या वादात भाजपनेही आता उडी घेतली आहे. वसंत लोढा यांनी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेवून भूमिका व्यक्त केली.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड ज्येष्ठ नेते अभय आगरकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वसंत लोढा पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा म्हणून आम्ही दोन वेळेस नगर शहरात जाणता राजा सारखे महान महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले होते.

यांनीही आजच्या युवकाच्या हातात महाराजांचे चरित्र द्यायला पाहिजे होते. मात्र यांनी लोकार्पणाच्या नावाखाली अश्लील गाणे लावत धिंगाणा घातला.

पोलीस प्रशासनानेही तीन तास हाय वे बंद ठेवून झालेल्या कार्यक्रमाकडे कानाडोळा केला आहे. प्रत्यक्षात भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी शहरातील शिवजी महाराजांच्या या पुतळ्याचे सुशोभिकरण केले होते.

ते आजही सुस्थितीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण झाले होते. जर महाराजांबद्दल आमदारांना खरा अभिमान असलेतर त्यांनी पुतळ्याभोवती सुरु असलेले अवैध धंदे बंद करावेत. पण त्यांच्याच आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत.