Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. नुकतेच प्रवरेच्या सहा जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजीच आहे. साधारण महिनाभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोन सख्खे भाऊ देखील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडले होते.
रितेश सारंग पावसे आणि प्रणव सारंग पावसे असे या भावांचे नाव होते. ही घटना १७ एप्रिलला घडली होती. परंतु आता त्यांचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा असा आरोप नागरिकांनी केलाय.
या मागणीसाठी बुधवारी (दि. २९) हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक – पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या, ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले, त्यांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली.
अनेकांची यावेळी भाषणे झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे, रवींद्र पावसे, ज्योती पावसे, तेजस्विनी पावसे, भीमाशंकर पावसे, अनिता पावसे आदींसह अनेकांची नावे आहेत. प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता, असेही निवेदनात म्हटले आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
दुर्दैवी मृत्यू झालेले दोघे भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिक्षण गेहत होते. प्रणव हा तिसरीत तर रितेश हा पाचवीत शिक्षण घेत होता. यांच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला होता. त्यामुळे आई शेती करून या दोघांचा सांभाळ करायची.
परंतु या मुलांच्या मृत्यू मागे वेगळेच कारणे असण्याची चर्चा सुरू आता सुरु झाली आहे. याप्रकरणी पोलीस यंत्रणेने बारकाईने चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.