अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : अर्बन बँक प्रकरणातील आरोपी वाढणार, थेट पोलीस उपअधिक्षकांची बँकेत येत अवसायकाशी चर्चा, ‘ती’ बडी मंडळी लवकरच जेलमध्ये?

Published by
Ahmednagarlive24 Office

आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार असलेले पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी आर्थिक गैरप्रकाराने गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेला भेट देऊन अवसायकांशी चर्चा केली. कर्जदारांची यादी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. लोकसभा निवडणूक झाल्याने कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

भारती यांनी भेट दिली, त्यावेळी अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, अॅड. अच्यूत पिंगळे आदी उपस्थित होते. फॉरेंसिक ऑडीटमध्ये काही आरोपींची नावे राहून गेल्याबाबत भारती यांनी माहिती घेतली. नजिकच्या काळात ती नावे आरोपींच्या यादीत असतील, असे ते म्हणाले.

अवसायक गणेश गायकवाड यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती कागदावर चांगली असल्याचे सांगितले. काही कर्जदार वसुलीला सहकार्य करत नसल्याने बँकेची तरलता संपली व बँक अडचणीमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले.

भारती यांनी ही बँक पुन्हा सुरू होण्यासाठी अवसायकांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. बँक वाचविण्यासाठी व पुन्हा सुरू होण्यासाठी बँक बचाव समिती करत असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. बँकेला अडचणीत आणणारे संबंधित संचालक, काही वरिष्ठ अधिकारी व कर्जदार यांच्यावरील कारवाईला वेग दिला जाईल, असे त्यांनी निक्षून सांगितले.

यावेळी ठेवीदार व बँकेची बाजू मांडताना राजेंद्र गांधी व अॅड. अच्युत पिंगळे म्हणाले, पोलीस तपासाला वेग दिला तर ठेवीदारांना ठेवी लवकर परत मिळतील. सोबत बँकेचे व सभासदांचे आर्थिक नुकसान भरून निघू शकते. बँक पुन्हा सुरू होण्याचा इतिहास घडू शकतो हे आकडेवारीसह सांगितले.

अमोल भारती यांनी पोलिसांकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. बँकेला समक्ष भेट दिल्यामुळे अनेक गोष्टी समजल्या आहेत. बँकेचे पूनर्जिवन झाल्यास माझ्यासाठी आनंदाची बाब असेल, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमुळे कारवाई काहीशी थंडावली होती. आता या विषयावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात येईल. फॉरेंसिक ऑडिटरला नवीन कागदपत्रे पाठविली आहेत. त्यातून आरोपींची नावे व घोटाळ्याच्या आकडेवारीत वाढ होईल.

त्याप्रमाणे कारवाईत देखील वाढ होईल असे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी एका मीडियाशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता आरोप असणारी परंतु सध्या बाहेर दिसणारी काही बडी मंडळी देखील तुरुंगात जाईल का अशी चर्चा सध्या रंगलीय.

Ahmednagarlive24 Office