शिर्डी येथील टॉवरच्या २४ बॅटऱ्या चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून सर्व २४ बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशक्ष, की श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील अमोल बाबासाहेब वर्षे यांची एटीसी टॉवर नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या शिर्डी येथील पिंपळवाडी रोडवरील टॉवरच्या २४ बॅटऱ्या दि. १५ डिसेंबर रोजी चोरीला गेल्या होत्या.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, सचिन आडबल, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, फुरकान शेख, कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे व मेघराज काळे यांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते.
तपासादरम्यान दिनांक १६ डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत आहेर यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा सुखदेव खिळदकर (रा. आष्टी, जिल्हा बीड) याने केला असून तो चोरी केलेल्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे येणार आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आहेर यांनी पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने लागेच अहमदनगर शहरातील चांदणी चौक येथे सापळा लावला. येथे त्यांना एक संशयीत इसम मिळुन आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव सुखदेव रामदास खिळदकर (वय ३०, रा. नांदुर विठ्ठलाचे, ता. आष्टी, जिल्हा बीड) असल्याचे सांगितले. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार आजिनाथ पवार (रा. राहुरी) याच्यासह केल्याची कबुली दिली. त्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या ३९ हजार रुपये किंमतीच्या एटीसी कंपनीच्या २४ बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.