अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : सरपंच पतीला डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न, अहमदनगर मधील ‘या’ गावात थरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : सरपंच पतीच्या अंगावर डंपर घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्याने ठार मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ही घटना नेवासे तालुक्यातील जैनपूर येथे घाली आहे. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जैनपूरच्या सरपंच शैला किशोर शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २५ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा परदेशी व त्याचे साथीदार हे गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूउपसा करून ती त्यांच्याकडील ४ डंपर व २ ट्रॅक्टरमधून घेऊन जात असताना माझे पती किशोर शिवाजी शिरसाठ यांनी गावातील लक्ष्मीमाता मंदिरासमोर सदरची वाहने अडविली.

त्यावेळी माझे पती किशोर शिरसाठ यांना कृष्णा परदेशी याने शिवीगाळ करून त्याच्या अंगावर गाडी घाला, याला जीवे ठार मारा… अशी धमकी देवून गाडी अंगावर घालू लागला. त्यावेळी मी तसेच माझी सासू पुष्पा, माझा मुलगा यश असे आम्ही या वाहनांना आडवे झालो असता माझे पती किशोर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कृष्णा परदेशी व त्याचे साथीदाराने वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर घेऊन तेथून पळवून नेले.

त्यावेळी कृष्णा परदेशी, पप्पू परदेशी, गणेश परदेशी, विकी परदेशी, बंटी परदेशी व गोट्या ड्रायव्हर (नाव माहिती नाही) हे तिथेच थांबून आम्हाला शिवीगाळ करीत होते. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी कृष्णा पूनमसिंग परदेशी व गणेश पूनमसिंग परदेशी या दोघांना अटक केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यामधील आरोपींवर जरब बसवण्यासाठी एमपीडीए कायद्यातील तरतुदी अन्वये कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ahmednagarlive24 Office