Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी आली. दोघा गोरक्षकांना अंगावर पिकअप घालून मारण्याचा प्रयत्न झाला हे आहि माहिती समजली आहे. गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे समजते.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बांगडी गावच्या शिवारात खांडवी कडे जाणाऱ्या रोडवर रविवारी (दि.२६) मध्यरात्री घडली. या घटनेत गोरक्षक आकाश लक्ष्मण गोसावी (वय २०, रा. गोसावीवाडी, मांडवगण, ता. श्रीगोंदा), मनोज रामचंद्र फुलारी (रा. शिरढोण, ता. नगर) हे दोघे जखमी झाले.
यातील गोसावी याने श्रीगोंदा पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पिकअप वाहन चालक महेश संदीप जाधव (रा. गोसावीवाडी, मांडवगण, ता. श्रीगोंदा) याच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि.२७) रात्री भा.दं.वि. कलम ३०७, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आकाश गोसावी व मनोज फुलारी हे गोरक्षक असून गोवंशीय जनावरांना कत्तल होण्यापासून वाचविण्यासाठी सतत कार्यरत असतात. रविवारी (दि.२६) त्यांना माहिती मिळाली की, महेश जाधव हा त्याच्या पिकअप मध्ये गोवंशीय जनावरांना घेवून कत्तलखान्याकडे जात आहे.
ही माहिती मिळताच त्यांनी श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस सदर पिक अप पकडण्यासाठी निघाले असता पिकअप चालक महेश जाधव यास याची माहिती मिळाली. तसेच आपली खबर पोलिसांना गोसावी व फुलारी यांनी दिली असल्याचेही त्यास समजले.
त्यामुळे त्याने या रागातून मोटारसायकलवर घराकडे चाललेल्या गोरक्षक गोसावी व फुलारी यांच्या मोटारसायकलला धडक देत पिकअप या दोघांच्या अंगावर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून दोघेही बालंबाल बचावले आहेत.
पिकअप च्या धडकेने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील गोसावी याच्या जबाबावरून आरोपी महेश जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.