Ahmednagar Breaking : सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय उपायुक्तांचा ‘मनाई हुकूम’ जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण व संजय घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंद सेवा मंडळाचे सदस्य लोढा, चव्हाण आणि घुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त यु.एस. पाटील यांच्याकडे ज्येष्ठविधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत अर्ज करून यांच्याकडे या जागेचा विक्री व्यवहार करू नये, यासाठी दावा दाखल केला होता. धर्मादाय उपायुक्त दाखल अर्ज क्रमांक १९५/ २०२४ नुसार धर्मादाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करीत हा मनाई आदेश दिला आहे. हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात असलेली हॉटेल ओबेराय शेजारी असलेली सिटी सर्वे नंबर १६१/१ प्लॉट नंबर ४३अ मधील तीन एकर २९ गुंठे जागा कवडीमोल भावाने विकण्याचा घाट घालण्यात आला होता.

ही जागा सरकारी किंमत ३२ कोटी असताना ती २५ कोटी रोजी हस्तांतरित करण्याचा डाव टाकला. या जागेवर जर बांधकाम झाले तर चालू बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ४०० कोटी रुपयांच्या घरात जाते. ही जागा सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट बी-५० देवस्थानची इनाम वर्ग ३ ची असून, ही मिळकत हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात अवघ्या ५०० रुपये प्रति वर्षाप्रमाणे आहे. १९६४ सालापासून मंडळाकडे असलेल्या या जागेचा करार आणखी ४० वर्ष शिल्लक आहे.

या जागेवर सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी वस्तीगृह होते. मंडळाने या वस्तीगृहाची इमारत मोडकळीस आल्यानंतर त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि मोडकळीस आलेली इमारत पाडली. भूखंडाचे श्रीखंड करण्याचे कारस्थान मंडळाचे विश्वस्त अजित सीमरतमल बोरा यांनी रचले. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य यांची मदत घेण्यात आली.

धर्मादाय आयुक्त व सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट बी-५० यांची परवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला. ताबा सोडण्याच्या बदल्यात सारडा कॉलेजला २५ कोटी रुपयांची इमारत बांधून देण्याचे ठरले. प्रत्यक्षात असे करता येते का? मंडळाला इतकी मोठी रक्कम वस्तू स्वरूपात जमिनीचा व्यवहार म्हणून घेता येते का? याची कोणतीही शहानिशा न करता बेकायदेशीरपणे संगणमताने कटकारस्थान रचून फसवणूक करण्याच्या दुष्ट हेतूने करण्यात आले.

या विरोधात वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले हे उभे राहिले. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून धर्मादाय श्रीमती यु. एस. पाटील धर्मादाय उपायुक्त अहमदनगर विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या म्हणून अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस पाठवण्यात आली.

तरीदेखील या कथीत गैर व्यवहाराचा परदाफाश करण्याचा त्यांनी चंग बांधला. आणि एका चांगल्या शिक्षण संस्थेची मोक्याची जागा कवडीमोल भावात जे लोकप्रतिनिधी आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता आयुक्तांनी या व्यवहाराचा मनाई आदेश जारी केला आहे आणि पालक म्हणून मंडळाच्या विश्वस्त आणि सदस्यांना निर्देश दिले आहेत, असे लोढा, चव्हाण, घुले यांनी सांगितले.