अहमदनगर ब्रेकिंग : १० लाखांचा गुटखा पकडला, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेच्या पोलिसांनी एका महिंद्रा पिकअपमधून १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपसह १६ लाखाच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तीन जण फरार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, पोलीस पथकाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील पुणतांबा फाटा या ठिकाणी छापा टाकून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपमधून इंदौर येथून कोपरगाव व संगमनेर येथील व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेला गुटखा वाहनासह जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजु उमराव भौल, वय ३२ वर्षे, रा. वार्ड नं. ३ गवाडी, ता. निवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश (चालक), मितेश राजू भाबड, वय २८ वर्षे, रा. अंबिकापूरो, पाणीटाकीसमोर, इंदौर, मध्यप्रदेश या दोघांना सोळा लाखाच्या मुद्देमालासह अटक केले.

ज्याच्याकडून गुटखा विकत घेतला तो इंदोर येथील गुटखा विकणारा व्यापारी आरोपी अभय गुप्ता रा. छोटा बांगरदा रोड, इंदौर, मध्यप्रदेश व विकत घेणारे योगेश कटाळे रा. कोपरगांव व किरण लामखडे रा. धारगांव, ता. संगमनेर हे तिघेजण फरार आहेत.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा नगरचे पोलीस नाईक संतोष राजेंद्र खैरे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe