अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: पैशासाठी पती आणि भायाने छळले, विवाहितेने जिवन संपविले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली.

शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शरद गोरख काकडे व भाया रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी वैशाली हरिश्‍चंद्र गुलदगड (वय 39 रा. सिव्हिल हडको, गणेश चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मयत शुभांगी हिचा मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत वैशाली गुलदगड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभांगी वाळुंज पारगाव येथे सासरी नांदत असताना पती शरद व भाया रवींद्र हे दोघे तिच्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

जागा घेण्यासाठी व पती शरद याला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरहून पैसे आणावे या कारणासाठी तिचा पती व भायाकडून छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने गुरूवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे…

आरोपी अटकेत शुभांगी हिच्या आत्महत्येची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना कळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. गुरूवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

नगर तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शुभांगीचा पती शरद काकडे व भाया रवींद्र काकडे यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द वैशाली गुलदगड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आज (शुक्रवार) त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office