अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते.

लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी सोमवारी (११ एप्रिल) गावात उपोषणाचा इशारा दिला आहे. या गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत.

त्यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ग्रामसभेने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आजपासून गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

हजारे यांना झेड सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे. आंदोलक उपोषण करण्यावर ठाम असल्याने रात्रीपासूनच पोलिस सावध आहे.

गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारे गावातच असून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात नित्याचे काम आणि भेटीगाठी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तेथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इशारा दिलेले कार्यकर्ते अद्यापपर्यंत राळेगणसिद्धीत आले नव्हते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office