अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आई-वडिलांच्या भांडणात आईची बाजू घेणाऱ्या आपल्या तरुण मुलाचा खून केल्याबद्दल आरोपी पिता गोरख उर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय ४५ रा. आखेगाव, ता. शेवगाव) याला गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा दिली.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे ही घटना होती. या घटनेत सोमनाथ (वय १८) हा मृत झाला आहे.
गेल्यावर्षी २९ मार्चला ही घटना घडली. त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. त्या दिवशी आरोपी गोरख कर्पे दारू पिऊन घरी आला होता.
सणासुदीच्या दिवशी दारू का पिवुन आला? अशी विचारणा त्याला पत्नीने केली. याचा राग येऊन आरोपी तिला मारण्यासाठी अंगावर धावून गेला.
त्यावेळी त्यांचा मुलगा सोमनाथ आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला. त्यावर आरोपीने मुलालाही शिवीगाळ केली आणि निघून गेला.
रात्री सोमनाथ आणि आई उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी पाठोपाठ गेलेल्या आरोपीने सोमनाथला गजाने मारहाण केली.
त्यात गंभीर जखमी होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला. शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपी कर्पे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला अटक झाली. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर झाली. हा खटला हा जिल्हा न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आला.
सरकारतर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन बी. पवार यांनी काम पाहिले. आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.