अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- तिसगाव प्रवरा येथील गौरव अनिल कडू या तरुणास लोहगाव हद्दीत जमिनीच्या वादातून डोक्यात टणक हत्यार मारल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला.
लोहगाव हद्दीतील गट नं. ६० (हाॅटेल ग्रीनपार्क समोर) या शेत जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी अमोल दिलीप नेहे, किशोर लहानू नेहे, वसंत लहानू नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे (सर्व रा. लोहगाव) यांना पाच जणांना लोणी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
३१ डिसेंबर रोजी सायंकाळी गौरव आणि त्याचा भाऊ किशोर चारा आणायला निघाले असता हे पाचही जण कडू यांच्या शेत नांगरत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून गौरव व त्याचा भाऊ किशोर यांनी याबाबत त्यांना जाब विचारला. जाब विचारताच आरोपींसोबत शाब्दिक बाचाबाची सुरु झाली.
त्यानंतर पाचही जणांनी मिळून गौरव व किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात गौरव गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी पाच जणांना लोणी पोलिसांनी अटक केली आहे.