अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वीही अनेक हनीट्रॅपचे प्रकरणे आढळली आहेत, हनीट्रॅप मुळे जिल्हा नेहमीच बदनाम होत आला असून आता पुन्हा एक अंगाला काटा आणणारी घटना घडली आहे.
अकोले तालुक्यात कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के (वय 24 ) या तरुणाने हनीट्रॅप मुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आलीय याबाबत सविस्तर वृत्त असे कि सुमित शिर्के या तरुणाला संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील एका मुलीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.
सहा महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या प्रेमाची चाहूल मुलीच्या आईला लागली. आणि या मुलीच्या आईने आपल्या मुलीला व सुमित शिर्के यांस समज दिली नाही. उलट आपल्या हाती बकरा लागला आहे असे समजून तिने सुमित शिर्के या तरुणाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
तू पैसे दिले नाहीतर तुझ्या घरी येऊन राडा करेल अन् तुला कायमचे आत बसवेल,अशी धमकी तिने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या सुमितने आपल्याकडे येतील त्या पद्धतीने मुलीच्या आईस पैसे देण्यास सुरुवात केली. सुमितकडे पैसे उपलब्ध नव्हते.
त्यामुळे त्याने आपल्या मोठ्या भावाकडून अन् आईकडून वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेतले व संबंधित मुलीच्या आईला पोहोच केले. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे सुमितचे अन् संबंधित मुलीचे पटत नव्हते. त्यांचे अनेकदा खटके उडायला लागले.
मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही, असे सांगून सुमितने तिला व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लॉक करून टाकले. मात्र ती मुलगी सुमितला सोडण्यास काही तयार नव्हती. ती घरातील इतर सदस्यांच्या मोबाईलवरून कॉल करून त्यास सतत मानसिक त्रास द्यायची.
या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमित हा मोठ्या मानसिक तणावाखाली होता. आपल्याला पूर्णतः या कुटुंबाने जेरीस आणले असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यातच मुलीच्या आईकडून कायमच होणारी पैशाची मागणी यामुळे सुमित आपल्या जीवाला कंटाळला होता.
हजार दोन हजार रुपये ठीक होती, मात्र आता पैसे मागण्याची त्यांची मजल ही खूपच वाढत गेली होती. सोमवार (ता.9) सुमित हा नेहमीप्रमाणे आपल्या घरात बसला असता त्यास मुलीच्या आईचा फोन आला, मला तू दुपारपर्यंत 50 हजार रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या घरी येऊन मी आज राडाच करते, तसेच तुझ्यावर पोलीस ठाण्यात जाऊन कम्प्लेट करते,
अशी धमकी दिली. मुलीच्या आईबरोबर मुलीने ही त्यास फोन करून 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मला तू जर 50 हजार रुपये पाठवून दिले नाहीतर मी घरा शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करणार आहे,असा इशारा तिने सुमित याला दिला.
त्यामुळे सुमित याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला,व घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
मयत सुमित शिर्के याच्या मृत्यूला प्रेमिका व तिची आईच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लवकरच या दोघींवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.