अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील नावाजलेल्या पतसंस्था अपहार प्रकरणी संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील विविध पतसंस्थेबाबत घोटाळ्यांसंदर्भात माहिती समोर येत असतानाच आता अंबिका ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, केडगावमधील ठेवींच्या अपहारप्रकरणी एक महत्वाची अपडेट आली आहे.

या पतसंस्थेच्या संबंधित संचालकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिले गेलेत. जिल्हा न्यायाधिश पी. आर. सित्रे यांनी हे आदेश दिले असल्याची माहिती फिर्यादीचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली. ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने अंबिका पतसंस्थेतील ठेवीदारांनी सहकार विभागाकडे तक्रार दिलेली होती.

लेखा परीक्षणात २ कोटी १३ लाखांच्या ठेवी अपहार झाल्याचा ठपका अध्यक्षांसह संचालक आणि व्यवस्थापनावर ठेवण्यात आलेला होता. तत्कालीन अध्यक्ष सर्जेराव कोतकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे आदींसह सर्व संचालक मंडळावर विश्वासघात करणे, फसवणूक करणे व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास होता त्यांनी त्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. नगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचालकांची मालमत्ता जप्त करून त्यावर महाराष्ट्र शासनाचा मालकी हक्क नोंदविला होता.

ठेवीदारांच्या वतीने या मालमत्तांच्या लिलावासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून उपरोक्त आदेश देण्यात आले आहेत. ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने त्यांना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत असून संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव झाल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे काही प्रमाणात मिळतील व त्यांच्या अडचणी सुटतील असे म्हणणे सरकारी वकील यू.जे. थोरात, फिर्यादी तर्फे अॅड. राजेंद्र शेलोत यांनी सादर केले होते.

न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरले असून आता संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश पारित केलाय. ठेवीदार कृती समितीच्या वतीने संजय मुनोत हे काम पहात असून न्यायालयाने दिलेल्या आदेशाने ठेवीदारांच्या समाधानाचे वातावरण असून पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office