अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- दाखल गुन्हा बंद करण्यासाठी बावीस हजारांची लाच मागणाऱ्या बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश बारवकर याच्याविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून बारवकर याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील तक्रारदार यांना बारवकर
याने त्याच्याकडे तपासकामी असलेल्या मिसींगमध्ये मदत करून मिसींग प्रकरण बंद करणेसाठी 50 हजाराची मागणी केली. तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
17 सप्टेंबरला लाच मागणी पडताळणीमध्ये बारवकर याने बेलवंडी पोलीस ठाण्यात पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 22 हजार रूपये लाच मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
लाच स्वीकारण्याअगोदर आरोपी बारवकर याला शंका आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी नगर लाचलुचपत विभागाने हवालदार बारवकर याच्याविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .