Ahmednagar Breaking : एसटी व रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, रुग्ण ठार, नातेवाईक गंभीर..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

 

Ahmednagar Breaking  : अहमदनगर जिल्ह्यातून अपघाताचे वृत्त आले असून रुग्णवाहिका आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर अपघात झालाय. यामध्ये रुग्णवाहिकेतील एक रुग्ण ठार झाला आहे.

तर सोबतचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री ८ वाजता संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात झाला आहे. ॲम्बुलन्स चालक देखील जखमी झाला असून गंभीर जखमी आहे.

समजलेली अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील कोंची येथे रविवारी रात्री एक दुचाकी रस्त्यात पडलेल्या झाडावर आदळली. या मध्ये बाळासाहेब धोंडीराम गिते (रा. कोंची, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून संगमनेर कडे चालवले होते.

रुग्णवाहिका कोकणगाव शिवारात आल्यानंतर एसटीला धडकली. ही बस संगमनेरहुन लोणीकडे चालली होती. ही धडक इतकी जोरात होती की, रुग्णवाहिकेतील रुग्ण बाळासाहेब गिते ठार झाला.

या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिकेमधील रुग्णाचे नातेवाईक गणेश लहानू गिते, संदीप भाऊसाहेब गिते हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले होते. ड्रायव्हर देखील जखमी असून त्यालाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिकांच्या साहाय्याने त्यांनी मदतकार्य पूर्ण केले.

दरम्यान काल पाथर्डीतही एक कार-दुचाकीमध्ये अपघात झाला. रोहिदास वनवे व मोठा मुलगा अविनाश वनवे हे बापलेक दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील अकोले गावच्या रस्त्यावरून आगसखांड गावाकडे कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होते.

त्यावेळी खरवंडी कासारकडून भरधाव कार त्यांच्या दुचाकीला धडकली. रोहिदास माधव वनवे (वय ५२), असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. मुलगा अविनाश रोहिदास वनवे (वय २४, रा. खडकवाडी, ता. आष्टी, जि. बीड) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.