अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौकात घडली.
सोनल अदिनाथ शिरसाठ (वय 17) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्यावेळी घरामध्ये सोनलचे आई-वडिल, भाऊ आदी कुटूंबातील व्यक्ती घरात होते.
रात्रीच्यावेळी सोनलने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबतची माहिती बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांना मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, पोलीस नाईक संभाजी बडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृत सोनल हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रूग्णालयात करण्यात आले आहे.
पोलिसांनी अकास्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक बडे करीत आहेत. दरम्यान सोनल शिरसाठ हिने गळफास घेण्यामागील काय कारण होते, याचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे. तपासाअंती सोनल हिच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.