अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नावाने 25 हजार रूपयांची लाच मागणी करणार्या नगररचना विभागातील लिपिकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास गोपीनाथ साठे (वय 44) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
पाथर्डी येथील तक्रारदार यांना बिअरबार व परमिटचा परवाना काढायचा होता. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेचा आवश्यक असलेला नाहरकतचा दाखला मिळण्यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता.
सदर अर्जावरून नाहरकत दाखला देण्याकरिता लिपिक साठे याने तक्रारदार यांच्याकडे मुख्याधिकारी लांडगे यांच्याकरिता म्हणून 25 हजार रूपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच मागणी पडताळणीमध्ये लिपिक साठे याने मुख्याधिकारी लांडगे यांच्या नावाने 25 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 12 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.
त्यानुसार शुक्रवारी लिपिक साठेविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर करीत आहे.
सदरची कारवाई उपअधीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस अंमलदार रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.