अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील वाळकी येथील बहुचर्चित ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून करणारे तिघे व आरोपींना आश्रय देणारा एक अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सराईत गुन्हेगार विश्वजित रमेश कासार (वय 29), मयुर बापूसाहेब नाईक (वय 20 दोघे रा. वाळकी ता. नगर), भरत भिमाजी पवार (वय 27 रा. साकत खु. ता. नगर),
संतोष आप्पासाहेब धोत्रे (वय 29 रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. 17 नोव्हेंबर 2020 रोजी ओंकार भालसिंग हे दुचाकीवरून जात असताना विश्वजित कासार व इतरांनी त्यांना अडविले.
मागील भांडणाच्या कारणातून ओंकार यांना मारहाण केली. उपचारादरम्यान ओंकार यांचा पुणे येथे खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.
विश्वजित कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध शिवीगाळ, मारहाण, फसवणूक, आर्म अॅक्ट, सरकारी कामात अडथळा, विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमान्वये 17 गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात 10, सुपा पोलीस ठाण्यात तीन, नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन, कर्जत, पारनेर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत. आणि त्याला अटक झाली…
विश्वजित कासार हा वाघोली (जि. पुणे) येथील हॉटेल श्रद्धा येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यांनी एक पथक कासार यांच्या अटकेसाठी रवाना केले. पोलिसांनी श्रद्धा हॉटेलच्या परिसरात सापळा लावला. आरोपी कासार तेथे येताच त्याला अटक केली.