Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक काळजाला घर करणारी बातमी अली आहे. स्वतः बापानेच पोटच्या मोठ्या मुलाला घरगुती वादातून गळा दाबून खून करून मारले. धक्कादायक म्हणजे त्याने त्यानंतर धाकट्या मुलास मद्गतीसी घेतले व तो मृतदेह दगड बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एका विहिरीत टाकून दिला.
हा प्रकार शुक्रवारी (३१ मे) उघडकीस आला. ८ मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनीच १० मे रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. तब्बल २३ दिवसांनी बापानेच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
गणेश अशोक एकाडे (वय ३१, रा. – एकाडे मळा) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याचा बाप अशोक लक्ष्मण एकाडे व भाऊ दिनेश अशोक एकाडे यांना ताब्यात घेतले. अशोक एकाडे याने १० मे रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिस अंमलदार डाके व वाघमारे याचा तपास करीत होते.
तपासादरम्यान तक्रारदाराकडून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोकवर संशय बळावला. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत होते. तसेच, संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता, बापानेच त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार दीपक रोहोकले यांना मिळाली. मृत गणेशचा बाप अशोक व त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यावर या खुनाचा उलगडा झाला.
रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे कार्य
खुनाच्या प्रकाराचा उलगडा होताच पोलिसांनी सदर विहिरीकडे आपला मोर्चा वळवला. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे आदींसह कोतवाली पोलिसांचे पथक त्या विहिरीजवळ जमा झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत सदर तरुणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते.
‘असा’ केला खून
८ मे रोजी घराच्या गच्चीवर अशोकने मुलगा गणेशचा खून केला. त्यानंतर धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले. मयत गणेश व त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.