Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अत्यंत धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे.पती-पत्नीच्या वादातील रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावायाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतला आहे.
याप्रकरणी पारनेर पोलीसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्याविरोधात वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली. रविवार, (दि. १७) डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली.
मयत संतोष शेंडगे याने पत्नी भानुबाई व त्याच्यामधील वादाच्या रागातून रविवारी दुपारी सासू राधाबाई चोरमले यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्याची माहिती संतोष याचा मुलगा सुभाष यास कळाल्यानंतर तो मेंढयांचा वाडा सोडून चोंभूत येथे आला.
आजीचा मृत्यू झालेला असतानाही संतोष शिविगाळ करीत असल्याच्या रागातून संतापलेल्या सुभाष याने बापाच्या डोक्यात लाकडी दांडके घातले. त्यात जखमी झालेला संतोष हा नगर येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत पावला.
यासंदर्भात मयत संतोष शेंडगे यांची पत्नी भानुबाई संतोष शेंडगे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात मुलगा सुभाष याच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती संतोष किरकोळ कारणांवरून मारहाण करीत असल्याने आपण गेल्या दोन-तीन वर्षांपासून संतोष याच्यासोबत न राहता मुलांचे मेंढयांचे वाडे असतील त्या ठिकाणी तसेच बहीण कांताबाई हिच्या मेंढयांच्या वाडयासोबत राहत होतो.
१५ ते २० दिवसांपूर्वी सासरे व दिरांनी संतोष यास म्हस्केवाडी येथे आपणाजवळ आणून सोडल्यानंतर तेथेही संतोष त्रास देत असल्याने मला आधार वाटावा म्हणून संतोष यास घेऊन चोंभूत येथील भावाच्या घराजवळ राहण्यासाठी गेलो हातो. ताडपत्रीचे पाल टाकून ते भावाच्या घराशेजारी राहत होते.
मात्र, तिथेही संतोष हा शिविगाळ करून झोपेत जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर भानुबाई, या आईच्या खोलीत झोपत असत. त्या रागातून तो आई राधाबाई तसेच भानुबाई यांना शिविगाळ करीत असे. रविवार, (दि. १७) डिसेंबर रोजी दुपारी दीड ते पावणेदोन वाजण्याच्या सुमारास संतोष याने पडवीमध्ये झोपलेल्या सासू राधाबाई यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारले.
संतोष याने राधाबाईचा खून केला, त्यावेळी भानुबाई व त्यांची नणंद, या शेतामध्ये काम करीत होत्या. चोरमले वस्तीवरून फोन आल्यानंतर त्या घरी आल्या असता, संतोष हा दारू पिल्यासारखी बडबड करीत शिविगाळ करीत होता असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संतप्त सुभाषने डोक्यात लाकडी दांडके मारले
राधाबाई यांचा खून करण्यात आल्याचे नातेवाईकांना कळविण्यात आल्यानंतर मेंढयांच्या वाडयावर असलेला संतोष व भानुबाई यांचा मुलगा सुभाष हादेखील तिथे आला. आजी राधाबाईच्या डोक्यात दगड घातल्याने तिचा मृत्यू झालेला असतानाही संतोष हा शिविगाळ करीत असल्याने संतप्त झालेल्या सुभाष याने तिथे असलेल्या लाकडी दांडक्याने वडील संतोष यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारले. त्यामुळे जखम होऊन संतोष याच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुरू झाला व तो जागेवरच कोसळला.
हे पण वाचा : चार जणांची एकत्र अंत्ययात्रा : आजी, आजोबा व नात एकाच सरणावर,आक्रोश व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार