Ahmednagar Breaking : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तुकाई देवीच्या मंदीरात चोरट्यांनी चोरी केली. देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा एक लाख रुपयांपेक्षा जास्त ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. एकनाथ देवराम शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि.१३ डिसेंबरच्या रात्री ६ नंतर व गुरुवार दि. १४ च्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान चोरांनी चोरी केली. यात देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम लंपास केले. यात ३० हजार रुपये किंमतीचा चांदीचा पुरातन मुखवटा,
अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे मनी व पळी असलेले देवीच्या मुखवट्यावरील दागिने, एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, २५ भार वजनाची चांदीची कपाळपट्टी, ४० भार वजनाची चांदीची छत्री, चांदीचे पैंजण, २ सोन्याच्या नथ, दोन दानपेट्यामधील ४ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला असे फिर्यादीत म्हटले आहे.
सुपा पोलिसांनी एकनाथ देवराम शेळके यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जी.एल.वारुळे, गुन्हा शाखेचे आहेर, हेंमत थोरात आदींनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पंचनामा केला.
गुरुवारी दुपारी डाँग स्काँडच्या सह्याने शोध मोहीम सुरु होती. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक जी.एल.वारुळे पुढील तपास करत आहेत.