बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व छळ करणारे व त्याबाबतचे गुन्हे दाखल असलेल्या १० आरोपींवर एमआयडीसी पोलिसांच्यावतीने नगर शहरासह नगर तालुका हददीतुन हददपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी असे दोन्ही उत्सव गुरुवारी (दि. २९) एकाच दिवशी साजरे होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता अवैधरित्या गोवंशीय जनावरांचा छळ व वाहतूक करणाऱ्या व त्याबाबतचे गुन्हे दाखल असलेल्या १० आरोपींना सीआरपीसी कलम १४४ (२) प्रमाणे बुधवारी (दि.२८) सकाळी ८ ते गुरुवारी (दि. २९) रात्री १२
या कालावधीत नगर शहरासह नगर तालुका हददीतुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांच्यावतीने नगरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
त्यास प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आरोपी इरफान रफिक पठाण (रा. जेऊर ता. नगर), अल्ताफ ईसाक शेख (रा. जेऊर ता. नगर),
जाफर हबीब पठाण (रा. जेऊर ता. नगर), मोहम्मद नुर ईस्माईल शेख (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर), सादीक अकबर चौधरी (रा. तापकीर गल्ली, गंजबाजार, अहमदनगर), जावेद हबीब पठाण (रा. जेऊर ता. नगर),
गणेश मच्छिद्र कुसमुडे (रा. निंबळक ता. नगर), नितीन रामदास डुकरे (रा. वांबोरी ता. राहुरी), कुमार बाळसाहेब कोरडे (रा. गणेशनगर, निंबळक ता. नगर), शहबाज नवाज शफी कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.