अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या अल्पवयीन मुलीला फूस लावून सांगली जिल्ह्यात पळून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी भिंगार पोलिसांनी अत्याचार करणार्या युवकासह त्याला सांगलीमध्ये मदत करणार्या युवकालाही अटक केली आहे. अत्याचार करणारा युवक मोहित बाबासाहेब कांबळे (वय 19) व त्याला मदत करणारा आकाश कचरू क्षेत्रे (वय 19 दोघे रा. सैनिकनगर, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कांबळे व क्षेत्रे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी सुरूवातीला भिंगार पोलीस ठाण्यात भादंवि 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आता अत्याचार, पोक्सो कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
1 डिसेंबर 2021 रोजी मोहित कांबळे याने अहमदनगर शहरातील एका उपनगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ करत होते.
त्यांनी अल्पवयीन मुलीला पळविणार्या युवकाची माहिती काढली. तो सांगली जिल्ह्यात त्याच्या मित्राकडे असल्याचे उपनिरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली. उपनिरीक्षक शिरसाठ यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश साठे, कोमल जाधव यांनी सांगली जिल्ह्यात जावून कांबळे व त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला.
कांबळे हा त्याचा मित्र क्षेत्रे याच्याकडे त्या अल्पवयीन मुलीला घेवून राहात होता. तेथे त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले आहे. तर आरोपी कांबळे व क्षेत्रे दोघे पोलीस कोठडीत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.