अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे. पोलीस खात्याची बदनामी करणे हे संभाषण आहे.
पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.
या अहवालानुसार पोलीस नाईक वैरागळ आणि पोलीस हवालदार राऊत यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 25 आणि मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल) 1956 चे कलम तीन नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोघांना निलंबित केले आहे.
या दोघांना पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे. दोघांनाही निलंबित कालावधीत खासगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.
दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजेरी द्यावी लागणार आहे. पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार आहे.