AhmednagarLive24 : नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
येत्या 21 जूनरोजी होणार्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही अजामीन पात्र वॉरंट बजावले आहे.
नगर अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले असून, यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला पाच लाखांचा दंडही केला आहे.
या पार्श्वभूमीवर सस्पेन्स खात्यातील या गैरव्यवहाराबद्दल चौकशीची मागणी होत होती. त्यातून न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते.
मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणार्यांच्या न्यायालयीन सरतपासणीत गांधी परिवारातील सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचे (काकू) नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना आरोपी ठरवून समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार होते. पण मागील तीन तारखांच्या सुनावणीस यापैकी कोणीही हजर झाले नसल्याने अखेर न्यायालयाने या तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून येत्या 21 जून रोजी होणार्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे बजावले आहे.