अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. सुभाष काशिनाथ निर्मळ (वय.५४) असे मयत वायरमनचे नाव आहे.
सदर दुर्दैवी घटना बाभळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील वाडी वस्तीवरील विज पुरवठा शनिवारी रात्री बिघाड झाल्याने खंडीत होता.
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी विज वितरणकडे आऊट सोर्समध्ये कार्यरत असलेले सुभाष काशिनाथ निर्मळ रविवारी सकाळी बाभळेश्वर येथे पोलवर चढले असता त्यांना विजेचा जबर धक्का लागला.
विजेचा जोरदार झटका बसल्यानंतर निर्मळ यांना तात्काळ प्रवरा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परीवार आहे. निर्मळ यांच्या दुदैवी निधनामुळे ग्रामस्थामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.