अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण करून तरुणीवर अत्याचार !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघा जणांनी रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे.

अपहरण करणाऱ्यापैकी एकाने आपल्याला गुंगीचे औषध पाजून सिन्नरमधील एका लॉजवर अत्याचार, मारहाण केल्याची तसेच पोटावर सिगारेटचे चटके दिल्याची तक्रार संबंधित तरुणीने पोलिसांकडे केली. मात्र याच प्रकरणात संबंधित तरुणीने सिन्नर पोलिसात आपण मर्जीने पळून आल्याचा जबाब नोंदविला असल्याने यातील गूढ वाढले आहे.

शहर पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मुख्य आरोपी प्रवीण अरुण लगड याच्यासह त्याचे जोडीदार संकेत भगवान राणे, दर्शन शिवाजी हिरे, आणि राहुल कैलास वाघमारे (चौघे रा. सिन्नर) अशी आरोपींची नावे आहे.

३० नोव्हेंबरला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाजवळून जाणाऱ्या या १९ वर्षीय तरुणीचे स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांनी अपहरण केले. या तरुणीला सुरुवातीला सिन्नरमध्ये नेण्यात आले, तेथे गुंगीचे औषध पाजून तिला मारहाण करत तिच्यावर प्रवीण लगड याने अत्याचार केला तसेच सिगारेटचे चटके दिले.

याचे मोबाईल मध्ये चित्रीकरणही करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चौघा आरोपींना तिला पंचवटी (नाशिक) येथे नेले. तेथे आरोपी लगड याने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर तिच्या सह्या घेतल्या. तेथून पुन्हा सिन्नरमध्ये आल्यानंतर लगड याने या तरुणीवर अत्याचार केले.

तिसऱ्या दिवशी सिन्नर पोलिसांसमोर तिला हजर करत ‘आपण आपल्या मर्जीने घरातून निघून आलो’ असल्याचा जबाब नोंदवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सिन्नर पोलीस ठाण्यात जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधत बेपत्ता असलेल्या या तरुणीची माहिती दिल्यानंतर

तरुणीच्या नातेवाइकांनी सिन्नरमध्ये जाऊन या तरुणीला ताब्यात घेतले. हा प्रकार घडल्यानंतर रविवारी या तरुणीने पोलीस ठाण्यात हजर होत सर्व घटनाक्रम सांगत चौघा जणांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी अत्याचार, फसवणूक, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करत चारही आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणात आरोपींनी तरुणीचा लगड याच्यासोबत विवाह झाल्याचे सांगितले, तसेच साक्षीदार म्हणून अन्य तिघांनी सह्या केल्या असून या विवाहाची नोंदणी करत त्याचा दाखलाही मिळविला आहे.

ही माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याने तसेच गजबजलेल्या संगमनेर महाविद्यालय समोरून झालेल्या या अपहरण प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती समोर आणण्याची जबाबदारी तपास अधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office