Ahmednagar News ; जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे (वय १६) या मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला विजेचा धक्का बसला.
त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून यामुळे सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खर्डा भागात एका महिन्यात तीन युवकांचा शॉक बसून मृत्यू झाला असून प्रशासनाचा ढिम्म कारभार चव्हाट्यावर आला आहे.
खर्डा येथे सहा कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून झाली आहे. फक्त उद्वाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा दवाखाना फक्त शोभेची वस्तू बनला आहे. याठिकाणी साप चावल्यावर,
विजेचा धक्का बसल्यावर तसेच पाण्यात बुडाल्यावर वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर नसणे, इंजेक्शन उपलब्ध नसणे, आरोग्य कर्मचारी संख्या कमी असल्याने व तातडीची कोणतीही आरोग्यसेवा रुग्णाला मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.यापूर्वीही वंजारवाडी येथील खोत, बाळगव्हाण येथील शिकारे व आता सातेफळ येथील हरी
मोरे या युवकांचा एक महिन्याच्या अंतराने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत सामाजिक प्रबोधन होऊन होणाऱ्या घटना टाळण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेतून मागणी होत आहे. दरम्यान, हरी मोरे याच्या मागे आई-वडील, बहिण, आजी, दोन चुलत भाऊ, एक चुलता असा परिवार आहे.