अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला.
अमोल मोहनराज वामन (वय २६ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वडगावपान शिवारात तळेगाव दिघे प्रादेशिक पाणी योजनेचा साठवण तलाव असून नजीक रस्त्याच्याकडेला प्रचंड काटवन आहे. रस्त्याच्याकडेच्या काटवनात अमोल मोहनराज वामन या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
याबाबत माहिती मिळताच वडगावपान युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, पोलिस पाटील सुभाष थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमोल मोहनराज वामन याच्या अंगात शर्ट नव्हता, त्याचा शर्ट नजीकच्या झाडाला लटकलेला होता. त्याची दुचाकीही नजीकच उभी होती. नजीक विषारी औषधाची बाटली व अन्य वस्तू आढळून आल्या.
पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.