अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता कोविड कक्षास आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्या कक्षामध्ये असलेल्या इतर काही रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मात्र याप्रकरणी अद्याप कोण दोषी आहे याचा उलगडा झालेला नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगरला भेट देऊन या घटनेची चौकशी सात दिवसात होईल अशी घोषणा केली होती.
त्यासाठी सरकारी स्तरावर एक कमिटी स्थापना केली. ती समिती अजूनही चौकशीच करत असल्याचं माहितीतून समोर येत आहे.
तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे मुख्य कारण मुंबई येथील मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अहवाला मुळे कळणार होते.
तो अहवाल मुख्य विद्युत निरीक्षक यांनी चौकशी समितीकडे पाठवला मात्र पोलिसांनी वारंवार पत्र देऊनही तो पोलिसांना पाठवण्यात आलेला नाही.
त्यासाठी पुन्हा पोलिसांनी मुख्य विद्युत निरीक्षक यांना नोटीस पाठवून अहवालाची मागणी पोलिसांनी केली आहे.
या प्रकरणातील मुख्य दोषींना पकडण्यासाठी तो अहवाल महत्वाचा आहे, मात्र अद्यापही पोलिसांना मुख्य विद्युत निरीक्षक यांचा अहवाल न मिळाल्याने सध्यातरी पोलिसांचा तपास थंडावला आहे.