अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात दोन टेम्पोच्या झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी,नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जवळ काल पहाटे ५ च्या दरम्यान टाकळी ढोकेश्वर पासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३ किलोमीटर अंतरावर दोन टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये टेम्पो (क्र. एम. एच.२१ बी. एच. ८५३५) वरील क्लीनर सोमीनाथ भाऊसाहेब सादरे (वय २१, रा. गाडे जळगाव, ता. जि. औरंगाबाद) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर चालक दिनेश गणेश गोल्डे (रा. रेवगाव, ता. जि. जालना) याचे अपघातामध्ये दोन्ही पाय तुटले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
दुसरा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ८०४७) वरील क्लीनर सोमनाथ केदार व चालक दत्तात्रेय गीताराम वावरे हे जखमी झाले आहेत.
अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार अपघातात एका वाहनाचा चालक केबिनमध्ये अडकला होता. येथील तरुणांनी मदत करून त्यास बाहेर काढले.