शहर काँग्रेस क्रीडा विभागाची मैदाने, क्रीडा हॉल खुले करण्याची मागणी ; जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले निवेदन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे सर्वच गोष्टी शासनाने बंद केल्या होत्या. मात्र शासनाच्या नवीन अनलॉक धोरणाप्रमाणे अनेक गोष्टी आता खुल्या करण्यात आल्या आहेत.

इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांची शहर आणि जिल्ह्यातील विविध मैदाने आणि क्रीडा हॉल क्रीडापटूंना सरावासाठी तात्काळ खुली करण्यात यावीत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी केली आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस, एन. एस. यु. आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे निवेदन गीते पाटील यांच्यासह काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना दिले आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे विशाल भाऊ कळमकर, युवा पुरस्कार विजेते भैय्या बॉक्सर, प्रशिक्षक नारायण कराळे, मच्छिद्र साळुखे, प्रमोद अबुज, अमित भांड, राष्ट्रीय खेळाडु प्रियांका शिरसाठ, युक्ता मिस्तरी, वर्षा अहिरराव मनोज उंदरे, आदित्य यादव, यश पगारे, तेजस रासकर , अनिल तोडकर आदींसह क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांच्याशी चर्चा करताना प्रवीण गीते पाटील म्हणाले की, कोरोना काळात अनेक महिने मैदाने बंद राहिल्यामुळे खेळाडूंचा सराव पूर्णतः बंद पडलेला आहे.

त्याच बरोबर अनेक नियोजित स्पर्धा या कालावधीमध्ये होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे खेळाडूंचे नुकसान झालेले आहे. तसेच छोट्या क्रीडा अकादमी चालवणाऱ्या प्रशिक्षकांचे क्रीडा प्रशिक्षण वर्ग बंद पडल्यामुळे त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने अनलॉक धोरण जाहीर केल्यापासून अनेक बाबींना मुभा दिलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन करून अनलॉक सध्या पाळला जात आहे.

यामध्ये मैदाने तसेच क्रीडा हॉल हे खुले करताना त्या नियमांचे पालन करत खेळाडूंना सरावासाठी मैदाने आणि हॉल तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या प्रशिक्षक, खेळाडूंच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागणीची प्रत जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24