अहमदनगर शहर

जिल्हा बँकेची सुरक्षा वार्‍यावर बंदूकधारी सुरक्षा रक्षकाऐवजी बॉऊन्सरचा पहारा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार्‍या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची सुरक्षा वार्‍यावर सोडण्यात आली आहे. बँकेत बंदूकधारी सुरक्षा रक्षकाऐवजी बॉऊन्सरचा बंदोबस्त लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शनिवारी (दि.20 नोव्हेंबर) बँकेच्या बाहेर बॉऊन्सर सुरक्षा रक्षक म्हणून उभा करण्यात आला होता. वास्तविक पहाता रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकामध्ये अधिकृत परवानाधारक बंदुकधारी सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे.

मात्र जिल्हा बँकेच्या सुरक्षेसाठी ठेका दिलेल्या खासगी ठेकेदाराने तसे न करता बाऊन्सरच्या हातात बँकेची सुरक्षा सोपवली आहे. जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा व्यवहार दररोज होत असतो.

विविध शाखांना या प्रधान कार्यालयातूनच रोख रक्कम पुरविली जाते. सध्या एटीएम फोडणे, रोकड लांबविणे अशा घटना घडत असताना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बँक असलेल्या जिल्हा बँकेची सुरक्षा वार्‍यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार एका खातेधारकांने प्रकाशझोतात आनला आहे.

दरोड्यासारखी परिस्थिती बँकेत उद्भवल्यास जबाबदारी कोणावर निश्‍चित करावयाची हा अनुत्तरीत प्रश्‍न उभा राहिला असून, खातेधारकांने बँकेची सुरक्षा चोख ठेवण्याची मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office