कांद्याची आवक वाढल्याने बाजार समितीचे नियोजन कोलमडले ! कांदा व्यापारी व शेतकरी झाले त्रस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील कांदा मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे नियोजन कोलमडत असल्याने कांदा व्यापारी व शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.

याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनासह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नेप्ती उपबाजार समितीमध्ये गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, केवळ नगरच नव्हे तर अन्य जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असून,नेप्ती कांदा विभागात फक्त विक्रीसाठी एकच सेल हॉल उपलब्ध आहे.

या सेल हॉलच्या क्षमतेच्या पाचपट अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे. नाईलाजाने आलेला कांदा पार्किंग व रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उतरवावा लागत आहे. त्यामुळे कांदा खरेदी केल्यानंतर खरेदीदारांना लोडिंग करतांना गाड्या वळविण्यास व लोडिंग करण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.

सदरहू ट्रक हे परराज्यातील असून गाड्या पुढे मागे करतांना वाद निर्माण होतात, व लोडिंग करतांना हा त्रास होऊन ट्रक लोडिंग करण्यास दिरंगाई होते व कांदा वेळेवर पोहोच होण्यास उशीर होतो, परिणामी व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

सोमवार, गुरुवार व शनिवारी लिलावाच्या दिवशी उपबाजार समितीमध्ये एकाचवेळी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आनलेले वाहन व ग्राहकाने घेतलेला कांदा भरुन बाहेर पडणारे वाहनामुळे दिवसभर वाहतुक कोंडी होते. तासनतास शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना वाहतुक कोंडीत अडकत आहे.