अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- करोना संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीचा सण अवघ्या एका दिवसावर आला असून नागरिकांनी देखील खरेदीचा आनंद लुटण्यासाठी बाजरात गर्दी करू लागले आहे.
यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शुकशुकाट असलेल्या बाजारपेठा यंदाच्या दिवाळीत गजबजल्या आहेत. शहरातील बस स्थानक रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या महावीर पेठ, नवी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज रोड,
राहुरी रोड या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विविध सवलतींद्वारे विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यापार्यांनी रस्त्यावर स्टॉल लावल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे.
दीपावली या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. रस्त्यांवर विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे. बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून सज्ज झाली होती. कपडे व्यापार्यांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत.
बसस्थानक परीसर व संभाजी चौकात झाडू, लक्ष्मी मुर्ती, पणत्या विक्रेते दाखल झाले आहेत. विविध आकारातील आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान कोरोनाच्या संकटांमुळे चार चौकटीत साजरी होणारी दिवाळी यंदा धुमधडाक्यात साजरी होणार असल्याचे चित्र सध्या बाजरातील गर्दीमुळे दिसून येऊ लागले आहे.