अहमदनगर (प्रतिनिधी)- दोरी व खांबावरच्या मल्लखांब स्पर्धेत खेळाडूंनी ह्रद्याचा ठोका चुकवित प्रात्यक्षिके सादर केली. अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा बुरुडगाव रोड येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेस शहरासह जिल्ह्यातील शालेय खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत मल्लखांब खेळातील मुला-मुलींचे कौशल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नंदकुमार झंवर तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहनलाल मानधना, असो.चे उपाध्यक्ष रावसाहेब क्षेत्रे, बजरंग दरक उपस्थित होते. प्रास्ताविकात अजित लोळगे यांनी कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांबची ओळख आहे. कसदार व पिळदार शरीरयष्टीसाठी युवक-युवतींना या खेळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन मल्लखांब खेळाची व स्पर्धेची माहिती दिली. नंदकुमार झंवर यांनी कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करुन यश मिळविण्यासाठी शरीर संपदा तेवढीच महत्त्वाची ठरते.
कुस्तीला पुरक असलेला मल्लखांब हा व्यायामप्रकार सध्या दुर्मिळ होत आहे. मोबाईलच्या युगात अडकलेली युवा पिढी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत असून, शालेय विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले. मोहनलाल मानधना यांनी गेलेली वेळ परत येत नसून, विद्यार्थ्यांनी शिक्षणाला खेळाची जोड दिल्यास जीवनाचा खरा आनंद घेता येणार असल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांसह रममाण होण्यात मोठा आनंद मिळत असल्याचे सांगितले.
स्पर्धेचे पंच म्हणून उमेश झोटींग, अनंत रिसे, अनिकेत सुसरे, सुजाता सब्बन, प्रणिता तरोटे, दिलीप झोळेकर, ओमकार केसकर यांनी काम पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून शकुर पठाण हे होते. विजेत्या खेळाडूंना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत यश प्राप्त खेळाडूंची पुणे येथे 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे.
अहमदनगर जिल्हा मल्लखांबचा संघ पुढीलप्रमाणे 12 वर्षाखालील मुले- सार्थ वाळूंजकर, केयुर शिंदे, देवदत्त चोरगे, अर्णव मांढरे, अविनिश ठाकूर, विशाल कोंगे, 12 वर्षाखालील मुली- गौरवी वाळूंजकर, धनश्री हराळे, मृन्मयी मुंगी, प्रांजल लाड, उर्विजा धुळगंड, नक्षत्रा आडेप, 14 वर्षा खालील मुले- आदिनाथ साठे, लक्ष्य राठी, ओम सानप, आर्यन गोयल, समर्थ कोथंबीरे, आदित्य गीते, 14 वर्षाखालील मुली- पायल लाड, उन्नती भांड, क्रितिका वैद्य, सृष्टी डेरे, 18 वर्षा खालील मुले- ओंकार नाकील, अनिरुध्द गाडेकर, आतिश घाटविसावे, भरत चव्हाण, वेदांत बिदे, अर्थव कोदे, 16 वर्षाखालील मुली- गौरी चौरे, गौरी गौड, अंजली गाजुल, संजना कोंगे, श्रध्दा आकुबत्तीन, साजरी परदेशी, 18 वर्षावरील मुले- प्रतिक डावखरे, विनायक सुसरे, श्रेयश दळवी, 16 वर्षावरील मुली- ऋतूजा गीते, साक्षी शेळके, प्राची खळेकर, आश्विनी दासरी, श्रेया म्याना, संतोषी चौधरी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित लोळगे यांनी केले. आभार उमेश झोटिंग यांनी मानले.