अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरात केंद्र शासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. पथकातील अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. मात्र, आता मोबाईल अॅपवरुन स्वच्छतेबाबत थेट प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे नवे मोबाईल अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, नागरिकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या पथकाकडून सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करतांनाच नागरिकांशी संवाद साधला जात आहे. मंगळवारपर्यंत पथकाकडून शहरात तपासणी होणार आहे. मात्र, नागरिकांना थेट प्रतिक्रिया नोंदविता यावी, यासाठी शासनाने स्वतंत्र मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ या अॅपवर नागरिकाचे नाव व मोबाईल क्रमांक टाकून प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविल्या जाव्यात यासाठी, मनपानेही पुढाकार घेतला आहे. कर्मचारी, अधिकार्यांना प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी नागरिकांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी ‘प्ले स्टोअर’मधून अॅप डाऊनलोड करावे व आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात असे आवाहन मनपाने केले अहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून स्वच्छतेबाबत व नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. घंटागाडीची माहिती मोबाईलवर उपलब्ध व्हावी, यासाठी मनपाने मोबाईल अॅप कार्यान्वित केलेले आहे. शहरात स्वच्छतेसाठी मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. सर्वेक्षणात देशातील पहिल्या 100 स्वच्छ शहरांमध्ये नगरचा समावेश व्हावा व ‘थ्री स्टार’ मानांकन मिळावे, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
मोबाईल अॅपवर कशी नोंदविणार प्रतिक्रिया?
प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी शासनाने ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे अॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध केले आहे. नागरिकांनी आधी हे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आपली भाषा निवडावी. भाषा निवडल्यानंतर राज्य, जिल्हा व शहराचे नाव आदी माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाचे वय व रहिवासी असल्याबाबत माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाला मोबाईलमधील जीपीएस-लोकेशन ऑन करावे लागेल. त्यानंतर स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक व लिंग आदीची माहिती भरावी. त्यानंतर मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांक टाकल्यावर प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येणार आहेत.