अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत कोंडले जाईल; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  वीज वितरण कंपनीने शहरी ग्राहकांचे वीज बिल वसुलीसाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली असून, याविरोधात शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा आणि ही जाचक वसुली बंद करावी अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत कोंडले जाईल, असा आक्रमक इशारा शिवसेनेनं दिला आहे. निवेदनात म्हटलं आहे की, याआधी वीज बिलाच्या वसुलीसाठी ग्रामीण भागात डीपी बंदची कारवाई केली होती.

आणि आता वीज वितरण कंपनीने शहरी ग्राहकांचे वीज बिल वसुलीसाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच मागील २ वर्षापासून कोरोना काळात उद्योगधंदे बंद पडल्याने हजारो कुटुंब बेरोजगार झाली आहेत. अशा परिस्थितीत वीज बीज थकल्याने किव्हा ऑनलाइन बिल भरल्याने तांत्रिकदृष्ट्या वेळ लागण्याने, त्याची वसुली वित वितरण कंपनीचे कर्मचारी वीज मीटर काढून ग्राहकांना संकटात टाकत आहे.

अशाप्रकारे वसुली महावितरणने थांबवावी. माणुसकीच्या नात्याने ग्राहकांना वागणूक द्यावी, अन्यथा शिवसैनिक आपला हिसका दाखवतील. येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेली आग, जाहिरात फलक लावताना कमानीत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे तरुणाचा झालेला मृत्यू, चितळेरोडवरील बेकरीला शॉर्ट सर्कीटमुळे लागलेली आग, काही दिवसांपूर्वी टीव्हीच्या केबलमध्ये वीज प्रवाह उतरून युवकाचा झालेला मृत्यू,

जिल्हा रुग्णालयाच्या एक्स्प्रेस फीडरमधून खाजगी रुग्णालयाला केलेला वीज पुरवठा या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. यामध्ये ज्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देण्यात यावी.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली यासंबंधी निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला आहे.