अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर येथील सराफ बाजारातील सोन्या चांदीचे व्यापारी अभय शांतीलाल कांकरिया यांच्याकडून उसनवारी घेतलेली रक्कम परत न करता त्यापोटी दिलेले तीन धनादेश न वटल्याच्या तीन स्वतंत्र खटल्यात दिनेश गौरीशंकर पारीक (रा. गंजबाजार, शेंगागल्ली, अहमदनगर) याला नुकसान भरपाई व प्रत्येकी एक महिना कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कांकरिया यांच्याकडून पारीक याने सप्टेंबर 2016 मध्ये 11 लाख रुपये उसने घेतले होते. त्या बदल्यात पारीक याने कांकरिया यांना सिंडीकेट बँकेचे अनुक्रमे 1 लाख, 5 लाख व 5 लाखाचे एकंदर तीन धनादेश दिले होते.
परंतु हे धनादेश न वटल्यामुळे कांकरिया यांनी नगर येथील न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचे कलम 138 नुसार तीन स्वतंत्र फौजदारी खटले दाखल केले होते.
आरोप सिध्द झाल्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. खंडाळे यांनी आरोपी पारीकला दोषी मानून अनुक्रमे रक्कम रूपये एक लाख 37 हजार 750, सहा लाख 76 हजार व सहा लाख 89 हजार 750 नुकसान भरपाई देण्याची व तीनही स्वतंत्र खटल्यात प्रत्येकी 1 महिना कैदेची शिक्षा सुनावली.
तीनही धनादेशांच्या रकमेवर नऊ टक्के दराने व्याज मिळण्याचा हक्क आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. फिर्यादी अभय कांकरिया यांच्यातर्फे अॅड. रमेश अ. जोशी व अॅड. दीपाली झांबरे यांनी काम पाहिले.