अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागून 11 रुग्णांचा करुण मृत्यू आणि 6 रुग्ण जखमी झाले होते.
या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या आठ सदस्यीय समितीची बैठक नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालयात पार पडली.
या चौकशी समितीच्या बैठकीत शासनास अंतिम अहवाल सादर करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीची ही बैठक विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात सुरू होती.
या चौकशी समितीच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पहिली बैठक यापूर्वी नगर येथे झाली होती. आठ तासांहून अधिक काळ या चौकशी समितीचे कामकाज चालल्याने नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेच्या निमित्ताने बर्याच बाबी उजेडात येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान या अग्निकांड प्रकरणी डॉ. विशाखा शिंदे, चन्ना अनंत, सपना पठारे आणि आसमा शेख या तिघी स्टाफ नर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स सपना पठारे यांच्यावर निलंबनाची तर चन्ना अनंत आणि आसमा शेख या दोघी स्टाफ नर्सवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती.